माझ्या मते "स्वातंत्र्य" म्हणजे नक्की काय तर,


 "७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा."


    "स्वतःचे योग्य विचार स्वतःच अमलात आणणे, म्हणजे स्वातंत्र्य" हि मी तयार केलेली व्याख्या. हि कितपत चूक किंवा बरोबर याचा निर्णय सर्वस्वी तुमचा. परंतु, उद्देश इतकाच की, आजच्या धकाधकीच्या जीवनात, खरं स्वातंत्र्य मी तरी गमावले आहे. कदाचित, इतरांच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवत असलं, तरी तो त्यांचा व्यक्ती-स्वातंत्र्याचा भाग आहे, या कारणाने मी हस्तक्षेप करणं टाळतो.


     खरे स्वातंत्र्य जर अनुभवायचे असेल तर, जेव्हा आपण एकटे असू, तेव्हा आपल्या सदसदविवेकबुद्धीने विचार करून त्याची अंमलबजावणी करणे . समूहात मिळालेले स्वांतत्र्य, हे एका बिनधास्त व्यक्तीमत्वालाच अमलात आणता येते आणि सामान्य माणूस मात्र समोरच्या व्यक्तींमध्ये स्वतःचा शोध घेत, आपल्या मनावर अन्याय करत जगत असतो.


     स्वतंत्र राहायचं म्हटलं तर मात्र काही नियम हे येतातच ते म्हणजे, 'स्वतःचा कितपत विचार करावा? एखादी गोष्ट करायची ठरवली, तर त्याचे परिणाम, नफा, तोटा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितपत समाधान' ह्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार करतो वा करावा अशी किमान अपेक्षा.


     आपला हा विविधतेने नटलेला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश व्यवस्थेतून स्वतंत्र झाला आणि सर्व जगाला एक ऐतिहसिक क्षण अनुभवण्याची संधी, भारत देशाच्या जनतेला या स्वातंत्र्यवीरांनी दिली, अश्या सर्व शुरयोद्ध्यांना विनम्र अभिवादन.


     आज आपण २०२२ व्या वर्षात जीवन जगत असताना, आपली ओळख एक नव्या उंचीवर घेऊन गेलो आहोत आणि ती राखण्यास इथल्या सर्व जनतेचा तेवढाच मोलाचा वाटा आहे. परंतु, एक गोष्ट मात्र अजूनही मनाला खटकते, ती म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य तर मिळालं, पण कोणतं आणि किती हे मात्र कोणी ठामपणे सांगू शकत नाही. या वाक्याला अपवाद गरजेच्या वस्तू असू शकतात, ज्यांची पूर्तता आपण वेळच्या वेळी करतो.


     स्वातंत्र्य दिनानंतर, काही वर्षांतच भारताने ऐतिहासिक असे भारतीय संविधान जनतेला दिले आणि खऱ्या अर्थाने आपण अंध आणि अनिष्ट चालीरीती मधून बाहेर पडत स्वतंत्र झालो. परंतु आपल्याला सार्वभौमत्व बहाल करणारं संविधान, आपण खरंच अमलात आणतो का? किंवा संविधानाच्या मूलभूत अधिकार आपण जाणतो का? ठराविक वर्ग आणि पेशा सोडला, तर सामान्य जनतेला संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांची क्वचितच माहिती असेल आणि त्यात नवल नाही. हि परिस्थिती फक्त अशिक्षित लोकांमध्ये नाही, तर आपल्या सारख्या सुशिक्षित/उच्चशिक्षित लोकांमध्ये सुद्धा आहे, हे माझ्या एका मित्राच्या आणि माझ्या संवादातून मी अनुभवले.  


माझा देश स्वतंत्र झाला असला, तरीही मी अजून स्वतंत्र झालो नाही, कारण मला माझ्या देशाचं संविधान पूर्णपणे माहीत नाही. जेव्हा मी संविधान वाचेन, तेव्हा मी एक स्वतंत्र भारतीय म्हणून वावरायला सक्षम असेन. कारण माझ्या संविधानात माझे मूलभूत अधिकार व मर्यादा नमूद केल्या आहेत व त्याचे पालन करणं, एक भारतीय म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. एकदा सविधांचा अभ्यास केला की मी माझ्या देशात अधिकृत आणि योग्यरित्या वावरायला मोकळा.


 तर आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, अशी प्रतिज्ञा घेतो की जेव्हा मी भारतीय घटना वाचेन आणि त्याला माझ्या दैनंदिन जीवनात अमलात आणून, माझं स्वतःचं अस्तित्व योग्यरीत्या निर्माण करीन. तेव्हा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने, या स्वतंत्र भारताचा खरा नागरिक होईन.


     भारत माता की जय.

- अभय पवार

(मी भारताचा नागरिक)


Comments

  1. 👍👍👍👍......🇮🇳 happy independence day 🇮🇳

    ReplyDelete

Post a Comment